Description
‘सुंभ आणि पीळ’ ही कादंबरी शोषित मातंग समाजाच्या अनेक पदरी जीवनरीतीचं वास्तव रूप उलगडून दाखविणारी एक अतिशय अभिनव कादंबरी आहे. मांग जातीच्या चालीरीती, व्यवसाय, असहाय जगणं, पराधीनता, संचिताच्या व व्यवस्थेच्या दडपणाखाली अपरिहार्य जगणं, अस्पृश्यतेतील गुलामगिरी, पुन्हा अस्पृश्यतेतील अस्पृश्यता, प्रथा परंपरेचं आंधळेपण, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, रूढी, तरीही गुंतागुंतीच्या जीवनरीतीतही समर्थपणे उभं राहून त्याला सामोरं जाणं, मजबूत, एकजीव सुंभातील चिवट पिळाप्रमाणं खंबीर राहणं-जगणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं प्रबोधन, स्वाभिमान व अस्मितेच्या जागृतीची दखल, धर्मांतर चळवळ अशा अनेकविध प्रश्नांची उकल अत्यंत समरसतेने, कळकळीने व व्यापक करुणेच्या भूमिकेतून लेखकाने इथं समर्थपणे मांडली आहे. संपूर्ण कादंबरी ही मातंगाच्या विशिष्ट बोलीभाषेत हा ‘आंबूज’ शैलीत मांडल्याने या संपूर्ण कादंबरीचा एक व्यापक सामाजिक अभ्यासाचा ‘दस्त’च झाला आहे.
या कादंबरीमुळे दलित साहित्याने अजून अर्धविरामही घेतला नाही हेच सिद्ध होते. मातंग जाती-जमातीच्या जगण्यातील अत्यंत वास्तव जीवनदर्शन, दाहक व विदारक चित्रण लेखकाने आपल्या समर्थ, ओघवत्या, नितळ शैलीतून केलं आहे. मराठी कादंबरीच्या ऐश्वर्यात ही कादंबरी तर भर टाकेलच; परंतु समग्र दलित साहित्यात व मराठी सारस्वतात प्रस्तुत कादंबरी मानाचं स्थान प्राप्त करेल असा विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.