Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.
————————————————————————————————————————
हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली.
खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच.
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’.
Reviews
There are no reviews yet.