Description
‘नागीण’, ‘नदीपार’ आणि ‘मामाचा वाडा’ या चारुता सागर यांच्या कथासंग्रहांनी मराठी कथेतील अनुभवविश्वाचे क्षितिज अधिक विस्तारित करण्याचे काम केले आहे. मानवी जीवनाचे अद्भुत वाटावे असे विश्व त्यांनी उभे केले. त्यांच्या कथेतील जीवनचित्रणाचा पैस हा विशाल स्वरूपाचा आहे. एक लेखक म्हणून अनुभवाची तीच ती वीण विणत बसण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांना जीवनाविषयी अपरंपार असे कुतूहल होते. त्या पोटी त्यांनी जीवनाची विविध तहेची चित्रे रेखाटली. ती अपूर्व अशी आहेत.
ग्रामीण स्त्रियांचं दुःखं, लष्करी पेशातील काऱ्या लोकांचं विश्व ते भटक्या निराधार, एकाकी, भणंग माणसांचं जिवंत विश्व त्यांनी कथेतून उभे केले. विस्तारित स्वरूपाची संवेदनशीलता शेतकऱ्यांपर्यंत सीमित न राहता भटके-विमुक्त, डोंबारी, नंदीवाले, गारुडी, फासेपारधी, जोगते, बेरड, मढे उचलणारे, रोहिला जमात, वाटमारी करणारे दरोडेखोर या जीवनाचा समग्र वेध घेते. गावगाड्यातील बदलत्या काळातील स्पंदनेही ते सूक्ष्मपणे टिपतात. प्राणिसृष्टींच्या सळसळत्या चित्रणात साप, नाग, अजगर, बैल, म्हशी, गाढवेही चपखलपणे येतात. मुक्या जनावरांची परवड आणि त्यांचं माणसांचं नातं केंद्रस्थानी येतं. तसेच माणूस आणि प्राण्यांच्या मरणानुभवाची विविध रूपे, लोकतत्त्वीय कल्पनाबंध, नव्याचा ध्यासही ती घेते..
अभिजात शहाणपण हे चारुता सागरांच्या भाषारूपाचे वैशिष्ट्य आहे. काव्यात्म अल्पाक्षरी शैलीत ते कथा सांगतात. निवेदनाच्या अनेक खूबींचा समर्थपणे उपयोग करतात. त्यामुळे मराठी कथा समृद्ध करण्यात त्यांच्या कथेचा फार मोठा वाटा आहे. वाचकाची समज विस्तारण्याचे व अभिनव कथारूप घडविण्याचे कार्य ती समर्थपणे करते.
Reviews
There are no reviews yet.