Description
एके काळी अवकाश आणि ग्रह म्हणजे फक्त अंधश्रद्धेचे प्रतीक होते. धूमकेतू पाहून लोक काहीतरी संकट येणार अशी कल्पना करीत असत. न्यूटन यांनी विज्ञानाच्या माध्यमातून लोकांची विचारसरणी बदलली. त्यांनी मानवासाठी असा एक दरवाजा उघडला जो त्यांना नवीन जगात घेऊन जात होता. जिथे ग्रह, उपग्रह, वेळ, गती हे सर्व मोजले जाऊ शकत होते. जिथे गणित होते आणि निसर्गाच्या नियमानुसार चालणारे विज्ञान होते. जे आपल्या वर्तमानासाठी जबाबदार आहे. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अनादिकालापासून गूढ असलेल्या प्रकाश आणि गतीचे कोडे सोडविले. एकूण ब्रह्मांडात पृथ्वीचे काय स्थान आहे आणि ब्रह्मांडात फिरत असलेले अवकाशपिंड काय आहेत आणि ते कुठून आले आहेत, याचे रहस्यही त्यांनी उलगडून सांगितले. त्यांनी संशोधित केलेले सिद्धांत ‘न्यूटनचे नियम’ या नावाने ओळखले जातात. आइन्स्टाईन म्हणाले होते, ‘‘सर आयझॅक न्यूटन यांच्यासाठी निसर्ग हे उघडे पुस्तक होते. जणू काही ते आजही आपल्यासमोर उभे आहेत. ठाम, निश्चिंत आणि एकाकी.’’
सर आयझॅक न्यूटन असामान्य आणि बहुरंगी प्रतिभेचे स्वामी होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील लँकाशायर येथील एका सामान्य कुटुंबात झाला होता. आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर त्यांनी विज्ञानातील आश्चर्यकारक अशी उंची गाठली, तरी जीवनभर त्यांना संघर्ष करावा लागला. आयझॅक न्यूटन यांनी प्रकाश आणि त्यांच्या विविध रंगांचे विश्लेषण करून या जगाला विविध रंगांचे ज्ञान करून दिले असले, तरीही त्यांचे स्वत:चे जीवन मात्र रंगहीन होते. सागरात निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीचे रहस्य त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले.
या पुस्तकात न्यूटनच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना व संदर्भ, त्यांचा स्वभाव, व्यवहार व प्रवृत्ती याबाबत विस्ताराने वर्णन आहे. त्यांच्या शोधाविषयीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
आयझॅक न्यूटन आपल्या काळातील सर्वांत मोठे व प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. त्यांच्याबद्दल त्याकाळी म्हटल्या जाणाऱ्या पुढील वाक्यांवरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावल्या जाऊ शकतो.
निसर्ग अंधारात होता.
निसर्गाचे नियम अंधारात होते.
आणि आजूबाजूला प्रकाश पडला.
न्यूटनने गुरूत्वाकर्षणाचा प्रसिद्ध सिद्धांत शोधला – ज्यानुसार पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्राकडे ओढते. न्यूटनचा महान ग्रंथ्क ‘प्रिंसिपिया’ विश्वप्रसिद्ध आहे. ज्यात त्यांची गतीच्या नियमाची (Law of Motion) व्याख्या आहे. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले.
——————————————————————————————————————–
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगाने आधुनिक युगात प्रवेश केला. या कार्यात सर्वांत अधिक योगदान सुप्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसनचे होते. आयुष्याच्या शेवटापर्यंत एडिसनने लोकसेवा व राष्ट्रसेवा केली. संशोधन हाच त्याचा निदिध्यास होता. आयुष्यात जन्मापासून शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वच बाजूने नकार असताना स्वत:ला कसे घडवावे याचा आदर्श आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणून थॉमस अल्वा एडिसन यांच्या आयुष्याकडे पाहता येते. फक्त एका कानाने वीस टक्के ऐकू येत असताना तारायंत्र, ठामोफोन इ. सारख्या ध्वनीसंंबंधी यंत्रांचा यशस्वीपणे शोध लावणाऱ्या एडिसनच्या कर्तृत्वाचा आलेख थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाचे फलित, आज आपले जीवन समृद्ध करणारेच ठरले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे चरित्र व कार्य तरुण पिढीला व वाचकांना आवडेल आणि मार्गदर्शक ठरेल, अशी खात्री आहे.
थॉमस अल्वा एडिसन जगातील सर्वश्रेष्ठ संशोधक होते. आयुष्यात जन्मापासून शारीरिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वच बाजूने नकार असताना स्वत:ला कसे घडवावे याचा उत्कृष्ट वस्तुपाठ म्हणून एडिसन यांच्या जीवनाकडे पाहता येते. एका कानाने वीस टक्के ऐकू येत असताना तारायंत्र, फोनोठााफ, मायक्रोफोन, सिनेमा इ. सारख्या ध्वनीसंबंधी यंत्रांचा यशस्वीपणे शोध लावला. विजेच्या दिव्याच्या बल्ब क्रांतिकारक शोधामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. पहिल्या महायुद्धाच्या काळात संरक्षण विभागासाठी अनेक यशस्वी प्रयोग केले. एडिसन यांना हजारोंच्यावर पेटंट मिळाले होते. त्यासाठीच त्यांना मेनलो पार्क चा जादूगार’ म्हटले गेले. संशोधनासाठी वाहून घेतलेल्या एडिसन यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी पारदर्शक होती. त्यामुळेच त्यांच्या चरित्राचा व कर्तुत्वाचा परिचय होणे, ही कोणत्याही काळाची गरज आहे. या असामान्य कुशाठा बुद्धिमत्तेच्या संशोधकाचे हलवून सोडणारे चरित्र ठरेल.
————————————————————————————————————————
‘मी आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल संपूर्ण विचारांती खालीलप्रमाणे माझे अंतिम मृत्युपत्र घोषित करीत आहे.. सत्यतेची खूण असणाऱ्या या कायदेशीर कागदपत्रांनुसार माझ्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या संपत्तीचा विनियोग व्हावा.
विश्वस्तांनी मूळ रक्कम सुरक्षित अशा कायमस्वरूपी निधीच्या स्वरूपात ठेवावी. या ठेवीवर मानवतावादी काम केलेल्या व्यक्तीला अथवा संस्थेला पुरस्काराच्या स्वरूपात बहाल करण्यात यावी.
हा पुरस्कार बहाल केल्या जाणाऱ्या व्यक्ती वा संस्थेच्या राष्ट्रीयत्वाविषयी कुठलाही किंतु मनात न बाळगता उचित व्यक्ती वा संस्थेस तो दिला जावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.’
– आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल
पॅरिस, 27 नोव्हेंबर 1895
डायनामाइटसारख्या अत्यंत स्फोटक पदार्थाची निर्मिती करणारा आल्फ्रेड प्रत्यक्षात किती मृदू स्वभावाचा होता हे त्याच्या हयातील फारसं जगासमोर आलंच नाही. डायनामाइटचा इतरांनी केलेल्या दुरूपयोगामुळे प्रचंड मानसिक यातनांना सामोरं जावं लागलेल्या आल्फ्रेडनं म्हणूनच आपल्या संपत्तीचा मोठा भाग मानवी कल्याणासाठी कार्य करणार्यांच्या गौरवासाठी मागे ठेवला. नोबेलच्या नावानं देण्यात येणारा हा पुरस्कार लवकरच जगातील अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून सुप्रसिद्ध झाला.
या समाजात असे खूप लोक असतात, जे आपल्या जीवनकाळात समाजावर आपली छाप सोडतात; परंतु थोडेच लोक असे असतात, जे मृत्यूनंतरही समाजात अजरामर राहतात. समाज जेव्हा त्यांच्या व्यक्तित्वाची आठवण करतो किंवा त्यांच्या कष्टांची फळे उपभोगतो, तेव्हा समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र काळानुसार आठवणींचा प्रवाह मंद होत जातो. खूपच कमी लोक असे असतात, ज्यांची समाजावरील छाप अनंत काळ कायम राहते आणि ते महापुरुष ठरतात.
अर्थात, असे लोक मात्र अतिशय विरळ असतात, ज्यांचे कर्तृत्व काळानुरूप वाढत जाते. अशा व्यक्तींची आठवण लोकांच्या हृदयात सदासर्वकाळ ताजी असते. आल्फ्रेड नोबेल असेच महापुरुष होते. आल्फ्रेड नोबेल यांचे जीवन अतिशय खडतर आणि बहुआयामी होते. स्वत:च्या बाबतीत तर त्यांनी मोजक्याच ओळी लिहिल्या असतील; परंतु पुढे त्यांच्यावर विविध भाषांमध्ये अथांग साहित्य रचले गेले. हे पुस्तकदेखील त्यांच्या व्यक्तित्वाला आणि कर्तृत्वाला संक्षिप्तपणे वाचकांसमोर मांडण्याचा विनम्र प्रयत्न आहे.
———————————————————————————————————————-
स्टीफन हॉकिंग, कायमचं शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. त्यांची जगण्याची जिद्दही त्यांच्या जीवनाची आणखी एक अलौकिक बाजू. कुशाग्र बुद्धी आणि प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या स्टीफन हॉकिंग यांनी अवकाशविज्ञानात सखोल संशोधन केले. विश्वाची निर्मिती, काळ आणि अवकाश यांचा परस्परसंबंध, कृष्णविवर या विषयांमध्ये त्यांना अतिशय रूची होती. हॉकिंग यांच्या विज्ञानाविषयीच्या कल्पना आणि दृष्टिकोन अत्यंत वेधक होता. त्यामुळे अन्य ग्रहांवर होऊ पाहणारी मानवी वस्ती, परग्रहावरील जीवसृष्टी, कृत्रीम बुद्धिमत्ता याविषयी त्यांनी वेळोवेळी स्पष्ट मते व्यक्त केली होती.
आपल्या अचाट बुद्धिमत्तेद्वारे अवघ्या विश्वाच्या उत्पत्तीचं गूढ उलगडू पाहणारा अवकाशसंशोधनातला हा अढळ ध्रुवतारा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही. ‘‘जीवन सरळ, साधे, सोपे नसते. आपल्या परिस्थितीत सुंदर जगायचा आपण प्रयत्न करायला हवा’’ हा त्यांचा संदेश आहे.
भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले. प्रा. स्टीफन हॉकिंग. कायमचं शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. ही व्यक्ती अपंग आहे. व्हीलचेअरवर बसून असते. साधे शारीरिक धर्मही जिला स्वत: करता येत नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने मात्र दिली आहे अचाट बुद्धिमत्ता व अलौंकिक जिद्द. त्यांची जगण्याची जिद्द ही त्यांच्या जीवनाची एक अलौकिक बाजू.
हॉकिंग यांना समाजिक मान्यता, अमाप लोकप्रियता संपूर्ण जगात मिळाली ती 1990-2000 च्या दशकात.
स्टिफन हॉकिंग यांनी विज्ञानाधारित भरपूर लेखन केलंय. ‘कृष्णविवर’ आणि ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ यावरही यांनी काम केलयं.
या पुस्तकात त्यांचे शास्त्रीय संगोपन तर सांगितले आहेत; पण त्यांची शास्त्रीय व्याख्याने, त्यांच्या मुलाखती व इतरांना व्यक्ती म्हणून ते कसे वाटतात याचाही ऊहापोह केला आहे. इ.स. 2000 नंतर परग्रहावरील वस्ती व आपले भविष्यकाळातील जीवन यावर त्यांनी दिलेली भाषणे संक्षेपाने दिली आहेत.
स्टीफन हॉकिंग यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद, जिद्द व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून आनंद मिळेल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.