Description
त्यांना स्वत:ला आता स्वत:चं ते दुसरं रुप दिसलं.
गणपतराव विस्फारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते आणि मग त्यांनी आपल्या थकलेल्या शरीराने उठून बसण्याची एक क्षीण, केविलवाणी धडपड केली.
लाल अंगरख्यातला आकार दात विचकून हसत हसत पुढे सरकत होता, कॉटवर वाकत होता.
गणपतरावांच्या तोंडून एक अर्धवट गुदमरल्यासारख्या आवाज आला आणि त्यांचा चेहरा रमाबाईंकडे वळला.
चेहरा पांढरा पडला होता, डोळे वटारले होते, घसा आवळला होता; काहीतरी बोलण्याची त्यांची निष्फळ धडपड चालली होती.
तो एक क्षण ते दोन्ही चेहरे रमाबाईंकडे पाहत होते.
एक भेदरलेला, पांढराफेक, काहीतरी बोलण्याची धडपड करणारा; दुसरा विचकलेल्या दातांचा, व्क्रर, दुष्ट, मत्सराने भरलेला….आणि मग गणपतराव किंचाळले रमा!…. मी….. मी…. मी….
वळून ते एकदम वेडेवाकडे पडले. तोंड उघडं होतं.
वटारलेले डोळे छतावर खिळले होते. छातीची हालचाल शेवटी थांबली होती.
आणि मग ते दुसरे गणपतराव कॉटला वळसा घालून सावकाश त्यांच्या दिशेने यायला लागले.
डोळे आता एका सैतानी विजयाच्या धुंदीत पेटून उठले होते.
रमाबाई जागच्या हलल्याही नाहीत. त्यांच्या मनात भीती, आशा या भावनांना जागाच नव्हती.
त्या शेवटच्या काही क्षणांत आता काय होणार आहे याची पुरेपूर कल्पना त्यांना आली होती; पण आता सर्व भावना थिजल्या होत्या.
त्यालाच काय, कशालाच काही महत्त्व नव्हतं.
————————————————————————————————————————–
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता.
गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात.
कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.
‘440, चंदनवाडी’ ही धारपांच्या गाजलेल्या भयचकित कादंबर्यांपैकीच एक.
या कादंबरीत शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अति प्राचीन अघोरी शक्ती आणि क्षणमात्र श्वास रोखून धरणारे प्रसंग हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य.
या शक्तीच्या विरोधात अनेक तंत्रशक्ती, मानसशक्ती, धर्मशक्ती उभ्या आहेत. धारपांच्या भयकथांचे खास वैशिष्ट्य येथेही पहावयास मिळते. कथा पूर्ण वाचून झाल्यावर वाचकाच्या शूचितेवरचा, मांगल्यावरचा, मानवाच्या मानवतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो.
या कादंबरीतील सर्व घटना वाचकांची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचवितात.
यातील गूढ आणि रहस्यमय घटना वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
Reviews
There are no reviews yet.