Kajol | काजोळ

₹250

224Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 9788177865813

Share On :

Description

‘काजोळ’ ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ते बालमन मानवी मनाचा विविधांगी तळ शोधू पाहते. या उत्कट बालमनाला संवेदनशीलतेचे धुमारे फुटू लागतात. नितळ, पारदर्शी, संस्कारशील बालमन आणि त्यावर उमटणारे जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील आणि सचेतन असतात. कोऱ्या पाटीसारखं असलेलं हे मन अनुभवाच्या अक्षरमुद्रा अधोरेखित करत जाते..
यात ग्रामपातळीवरील बेरकी, धूर्त, मतलबी संबंध, व्यसन-बाहेरख्यालीपणा या अपप्रवृत्ती, परस्परांतील हेव्या-दाव्यांचे, असूया-मत्सराचे प्रगटीकरण, मानवी जीवनातील काळ्याकुट्ट ढगांना आढळणारी सत्प्रवृत्तींची सोनेरी कडा, दुःखगर्भ अडचणीतही परिसाच्या हाताची मिळणारी मदत, गरिबी अन् दारिद्र्यानं पिडलेल्याचा शिकण्यासाठी चाललेला संघर्ष- हे सगळं जगण्याचा भाग म्हणून ‘काजोळ’मध्ये आलंय.
कथानायकाची शिक्षणासाठीची धडपड, वास्तव कटु-कठोर जीवनानुभवाचं दर्शन, शाळासोबत्यांचा निर्मळ निर्व्याजपणा, प्रयणांकुराची अस्फुट चाहूल, तसेच साहसाची ऊर्मी इथं आहे.
लेखकाने खेड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सांगितलेली रोमहर्षक व भावविभोर अशी ही कथा आहे. या अल्पशा प्रवासात भेटलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या, शिक्षक-हितचिंतकांच्या लागेबांध्यांची, अतूट अशा भावबंधाची ही जणू प्रेमकहाणी आहे. लेखकाची बालमनाची समजही सूक्ष्म-सखोल आहे. बालमनाची हळवी कातरता, उदासीन हळुवारता आणि कोमल भावुकता ‘काजोळ’मध्ये सर्वत्र आढळते. यातील भाषा प्रसन्न आणि सुबोध आहे; तसेच तिला विलोभनीय डौल आणि सुखद गती आहे.
‘काजोळ’चा रूपबंध कादंबरीसदृश असला, तरी त्याला प्रसन्न ललित गद्द्याचा घाट प्राप्त झाला आहे. तसेच गद्यलेखनास आत्मपर लेखनरीतीची डूब मिळाल्यामुळे ते अधिक भावस्पर्शी व आस्वाद्य झालेले आहे.
– डॉ. एस. एम. कानडजे

Additional information

About Author

बाबा भांड
जन्म वडजी, पैठणजवळील खेड्यात, २८ जुलै १९४९.
बालपणापासून कमवा व शिका हा संस्कार. शिक्षण एम. ए. इंग्रजी. आठवीत बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. दहावीत जागतिक स्काउट-गाइड मेळाव्याच्या निमित्तानं अमेरिका-कॅनडा आदी दहा देशांचा प्रवास. लेखकच व्हायचं स्वप्न होतं. सहावीपासून लेखनास सुरुवात. १९७५ साली पत्नी सौ. आशाच्या मदतीनं धारा व नंतर साकेत प्रकाशनाची सुरुवात. आतापर्यंत अठराशे पुस्तकांचे प्रकाशन.
बाबा भांड यांच्या आतापर्यंत नऊ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णनं, चार ललित गद्य, चार चरित्रं, चार आरोग्य व योग, नऊ संपादनं, चार अनुवाद, पंधरा किशोर कादंबऱ्या, एकोणावीस बालकथा संग्रह, तीन एकांकिका, सत्तावीस नवसाक्षरांची पुस्तके प्रकाशित.
साहित्य अकादमीचा बालसाहित्य, महाराष्ट्र शासनाचे अकरा, महाराष्ट्र फाउंडेशन, दमाणी आणि इतर पंधरा पुरस्कार. त्यांच्या साहित्यावर पाच विद्याथ्यांची पीएच.डी., अभ्यासक्रमात पुस्तके व पाठ.
जन्मगावी पाणलोटक्षेत्र विकास, वाचनालय, गरीब अपंग-मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, योगसाधना संस्थेत विश्वस्त, समाजोपयोगी कामात सहभाग, प्रकाशनाच्या कमाईतून वरील कामासाठी पंचवीस लाखांहून अधिक मदत. लेखन-प्रकाशनासोबत शेती, प्रवास आणि फोटोग्राफीचा छंद. महत्त्वाचं जग फिरून झालंय.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, तसेच सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.
email : baba.bhand@gmail.com, http://www.bababhand.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kajol | काजोळ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat