Description
“तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता, आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती- पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावी-उजवीकडे वाहत्या गतीने हलायला लागली.
त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती.
कोठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला.
वेळ- तो एक क्षण- ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती; तारांगणासारख्या असंख्य, हजारो ज्योती होत्या.
त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतीचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता.
आत कोठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता.
एक एक अलग ज्योत अशा एकत्र येताच झगमगाट झाला होता.
लहान लहान वाऱ्याच्या झुळकीचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता…आणि असं वाटत होतं की या क्षणाची, या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे… सुटकेसाठी ती विलक्षण धडपड! सारी हालचालच गोठली होती! फक्त निद्रव्य मन आतल्या आत तडफड करीत होतं.
तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमद गतीने उलटत होता…. त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल, तो क्षण उलटेल, इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल… त्या आधीच…. त्या आधीच….”
————————————————————————————————————————–
“…पाण्याची फेसाळणारी कड जवळ जवळ येत होती आणि तिला हलताच येत नव्हतं.
पायचं नाही, तर सारं शरीरच कसल्या तरी चिकट द्रावात रुतून बसलं होतं.
तिथून सुटण्यासाठी तिने आटापिटा केल्याची एक स्मृती मनात होती, पण आता अवयवांत त्राणच उरलं नव्हतं.
पाण्याची कड एखाद्या अधाशी जनावरासारखी सारखी पुढे सरकत होती.
लाटेवरचा फेस वासलेल्या जबड्यातल्या दातांसारखा दिसत होता. पाणी तिच्यापर्यंत पोचलं.
शरीराला एक मखमली स्पर्श करून मागे सरलं. हा गोंजारणारा मखमली स्पर्श विषारी होता. शरीरातलं सर्व बळ एकवटून तिने एक उसळी मारली.
पण व्यर्थ! एखादा इचच ती हलली असेल…पाणी पुन्हा आलं…त्याला घाई नव्हती .. ते आपला वेळ घेत तिला सावकाश मारणार होतं…त्याच्या तावडीतून ती आता सुटत नव्हती…मऊसर, गारेगार, रेशमी हातांनी ते तिला मारणार होतं…त्याचे चमकणारे पदरामागून पदर तिच्यावरून जातील…नाक, तोंड, डोळे, कान सर्वांवाटे ते शरीरात शिरेल…शरीरातला कानाकोपरा त्या फेसाळणाऱ्या पाण्याने भरून जाईल… ती किंचाळली…पण पाण्याच्या गर्जनेत तो क्षीण आवाज केव्हाच विरून गेला…पाणी तिच्या शरीरावरून पुढे गेलं होतं…छातीपर्यंत आलं … गळ्यापर्यत आलं….तोंडापर्यंत आलं.. “नको….नको .. आई!”
Reviews
There are no reviews yet.