Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
मूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर ‘अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.
गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.
“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल.’
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
————————————————————————————————————————–
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
Reviews
There are no reviews yet.