Description
काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती.
काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.
तिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे.
रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहेपायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे – आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे.
या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले…
कोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.
————————————————————————————————————————–
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता.
गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले.
दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात.
कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.
‘440, चंदनवाडी’ ही धारपांच्या गाजलेल्या भयचकित कादंबर्यांपैकीच एक.
या कादंबरीत शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अति प्राचीन अघोरी शक्ती आणि क्षणमात्र श्वास रोखून धरणारे प्रसंग हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य.
या शक्तीच्या विरोधात अनेक तंत्रशक्ती, मानसशक्ती, धर्मशक्ती उभ्या आहेत.
धारपांच्या भयकथांचे खास वैशिष्ट्य येथेही पहावयास मिळते.
कथा पूर्ण वाचून झाल्यावर वाचकाच्या शूचितेवरचा, मांगल्यावरचा, मानवाच्या मानवतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो.
या कादंबरीतील सर्व घटना वाचकांची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचवितात. यातील गूढ आणि रहस्यमय घटना वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
Reviews
There are no reviews yet.