Description
इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते.
जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे.
जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे.
जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे|
————————————————————————————————————————
जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्ये लिहिले. आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्ध असताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यास त्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल. ‘असूड’ लिहिला गेला त्या वेळी देशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतः निराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्या काही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहज ध्यानात येऊ शकेल. या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न आवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचे निदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याची दिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोह आजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. याचा अर्थ असा, की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जे सांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटत आल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्या पुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे. – भास्कर लक्ष्मण भोळ
Reviews
There are no reviews yet.