fbpx

Talghar | Kali Jogin

₹375

256 Pages
AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 978-9352206599

Share On :

Description

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते.
पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे.
कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या.

तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता.
झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते.

विलक्षण शांतता. हालचाल नाही.
उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल.

सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.”

————————————————————————————————————————–

काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती.
काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.

तिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे. रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहेपायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे – आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे. या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले…
कोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Talghar | Kali Jogin”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat