Description
त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?
दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती.
कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. मूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर ‘अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.
गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.
“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल.’
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर









Reviews
There are no reviews yet.