Description
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे.’ या न्यायाने जे थोर साधुसंत आजवर होऊन गेले त्यांनी अध्यात्मविद्येला प्रत्यक्षात आणलं आहे. खऱ्या ‘मी’ चा शोध घेताना देहबुद्धीतून प्रतीत होणारा ‘मी’ पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच अविद्या नाश म्हणतात.
आपलं सत्यस्वरूप त्याच्याबद्दलच्या आपल्या अज्ञानाने झाकलं गेलं आहे. ते अज्ञान दूर झालं की सत्चिदानंदस्वरूप ‘मी’ चा साक्षात्कार होतो. ‘मी’ चा शोध कुठे घ्यायचा? तर स्वतः मध्ये! त्याने काय फायदा होणार ? तर मी निर्भय होईन, मला जीवनाचा खरा अर्थ उमगेल.
‘मी’ चा शोध म्हणजे काय इथपासून ते तो कसा घ्यायचा, किती काळ घ्यायला हवा, आनंद म्हणजे काय? सर्वोत्तम भक्त कोण? ज्ञानदृष्टी कशाला म्हणतात ? वैराग्य कशाला म्हणतात ? मन निश्चल कसं करावं ? अशा अनेक प्रश्नांचं निराकरण या पुस्तकातून नक्कीच होईल.
भगवान श्री रमण महर्षीचे मोजके; पण अतिशय मार्मिक शब्द थेट अंतरात्म्याला स्पर्श करतात आणि मनातली सगळी किल्मिषं दूर होत जातात. आत्मसाक्षात्कारी महात्म्याचं दृश्य लक्षण म्हणजे प्रत्येकाला तो आपल्यावर सर्वांत जास्त प्रेम करतो असं वाटतं. मदात्मा सर्वभूतात्मा या दृष्टीनेच हा महात्मा सर्वांभूती आत्मस्वरूपच पाहतो. त्याची ज्ञानदृष्टी सर्वत्र अकृत्रिम प्रेमाचा वर्षाव करते. भगवान श्री रमण महर्षीचं दर्शन असं आहे. त्यांच्या उपदेशातून क्लांत मनाला शीतलता लाभते, बुद्धिवादींचा अहंकार गळून पडतो, मनाला अंतर्मुख होण्याचं कौशल्य गवसतं. अज्ञानातून आनंदासाठी, सुखासाठी धडपडणाऱ्या जीवाचा विवेक जागा होतो आणि जिज्ञासू साधकाला कैवल्याच्या चांदण्यात विहरण्याचं सुख लाभतं







Reviews
There are no reviews yet.