Description
तथागत बुद्धांचे जीवन हे करुणा, प्रज्ञा आणि शांततेचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांनी मानवी दुःखाचा शोध घेतला आणि त्यावर उपाय म्हणून चार आर्यसत्ये व अष्टांगिक मार्ग यांचा उपदेश केला. त्यांचे जीवन केवळ धार्मिक प्रवास नव्हे, तर मानवी मूल्यांचे पुनर्निर्माण करणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे.
प्रख्यात विचारवंत आणि समाजसुधारक प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या उपदेशांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. साध्या, ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषेत मांडलेला हा ग्रंथ वाचकांना ज्ञानप्राप्तीच्या प्रवासात सहभागी करून घेतो.
या पुस्तकात वाचकांना…
* बुद्धांचे बालपण, राजवाड्यातील जीवन आणि वैराग्याची सुरुवात
* ज्ञानप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या
* धर्मचक्रप्रवर्तन आणि संघाची स्थापना
* समता, अहिंसा आणि बंधुभावाचा संदेश
* बुद्धांच्या महत्त्वपूर्ण उपदेशांची मांडणी
अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत अनुभवता येते.
‘बुद्धलीलासारसंग्रह’ हे केवळ वाचनासाठी नसून जीवनासाठी दिशादर्शक ठरावे, हीच त्याची खरी विशेषता आहे.
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.









Reviews
There are no reviews yet.