Description
राजाराणी, रहस्य व रोमांच यांनी भरलेल्या मनोरंजनाच्या वातावरणातून हिंदी साहित्याला वास्तवाच्या जमिनीवर प्रथम उतरवले ते प्रेमचंद यांनी.
स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजव्यवस्था, जमीनदारी, सरंजामशाही, औद्योगिकीकरण यांचा समाजजीवनावर असलेला प्रभाव व परिणाम यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसून येते.
ते एका साहित्यिक युगाचे प्रवर्तक ठरले. ते सामान्य भारतीयांचे लेखक होते.
निम्न व मध्यमवर्गातील सामान्य माणसाला कथाविषय बनवून त्यांनी वास्तव जीवनाचे चित्रण केले.
शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इ. उपेक्षित वर्गातील माणसे त्यांच्या साहित्याचे नायक होते.
ग्रामीण समाजातील गंभीर समस्यांचे त्यांनी वास्तव चित्रण केले.
भूतकाळाचे गौरवगायन व भविष्यकाळाविषयी अतिरंजित कल्पना या दोन्ही गोष्टींना टाळून त्यांनी वर्तमानकालीन परिस्थितीचे विश्लेषण केले. प्रेमचंदांच्या मूळ कथा वाचल्या की, त्यांच्या भाषेचं साधेपण लक्षात येतं.
साध्यासुध्या माणसांच्या या कथा तेवढ्याच साध्या भाषेत लिहिल्या आहेत. यात मैत्रीमध्ये धोका देणारा ‘मदारी’ जसा आहे तसेच आपल्या विरुद्ध निकाल दिला तरी मैत्री जागवणारे जुम्मन व अलगूही आहेत. एखाद्या स्त्रीवर निरतिशय प्रेम करून तिच्या गर्भातलं दुसऱ्या कोणाचं मूल अत्यंत प्रेमानं आपला समजणारा गंग आहे. तसाच अगदी पहिल्या कथेतला मंदिर, मशीद एकसारखा मानणारा ‘जामिद’ही आहे. ही माणसं वरवर पाहता भोळसट वाटतात; पण त्यांच्यातली आत्यंतिक माणुसकी त्यांना छक्क्यापंजांपासून दूर ठेवते. देवाची पवित्र बाळं असल्यासारखी ही माणसं कथेला वेगळ्या उंचीवर नेतात. सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, जमीनदारी, कर्जखोरी, गरिबी व वसाहतवाद या विषयांवर प्रेमचंद जीवनभर लिहीत राहिले. आठ दशकांपूर्वी त्यांनी जे लिहिले ते आजही लोकप्रिय आहे. त्यांचे साहित्य आजही समाजजीवनाचा व मानवी प्रवृत्तींचा आरसा आहे.
Reviews
There are no reviews yet.