Description
मराठीतल्या ज्या काही लेखकांच्या असामान्य भाषाशैलीवर मी मातृवत प्रेम केले,
त्यापैकी ग. दि. माडगूळकर हे एक.
गेयतेचे प्रासादिक लेणे ल्यालेली त्यांची कविता ही अभिजात खरीच.
वाचकाच्या आणि श्रोत्यांच्या थेट काळजात उतरणारी माडगूळकरांची अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न शब्दकळा हे मराठी साहित्याचे एक मोठे भूषण.
पंचवीसतीस हजार जाणकार श्रोते एका वेळेला त्यांचे ‘गीतरामायण’ ऐकायला उपस्थित राहतात.
ही अद्भुत किमया मराठी कवितेच्या क्षेत्रात फक्त ग. दि. माडगूळकरच करू शकले.
अन्य कोणा नावाची त्यांच्या जागी कल्पनाही करता येत नाही.
पद्यलेखणीइतकीच गदिमांची गद्यलेखणीही अतिशय प्रासादिक व प्रवाही.
त्यांच्या प्रसन्न कवितेशीच नाते साधणारी. या पुस्तकात पानोपानी वाचकाला या नात्याची ओळख पटल्यावाचून राहणार नाही.
व्यक्तिचित्रे हा साहित्यप्रकार एकंदरीत तसा उपेक्षितच म्हणावा लागेल.
केवळ मराठीतच नव्हे, तर अन्य कुठल्याही जागतिक भाषेत या प्रकारचे लेखन फारसे होतच नसावे.
मराठीपुरते बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, कथा-कादंबरी-काव्य-चरित्र-आत्मचरित्र इत्यादी साहित्याच्या तुलनेने व्यक्तिचित्रसंग्रहांची संख्या कितीशी भरेल? नाही म्हणायला गेल्या दोनअडीच दशकांत मराठीत काही उत्तम व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिद्ध झाले.
या पोर्शभूमीवर गदिमांचा प्रस्तुत संग्रहही खचितच लक्षणीय ठरेल.
या संग्रहातल्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी माडगूळकरांचे निकटचे संबंध होते.
त्यांची लेखणी या व्यक्तींमधल्या माणुसकीचा सतत वेध घेत असते.
त्यांच्या जीवनातल्या लहानसहान प्रसंगांतूनही मोठा आशय मांडते.
सर्वसामान्य घटनांतून असामान्यत्वाचे दर्शन घडवते.
मनुष्यजीवनातल्या काही निष्ठांवर, आदर्शांवर आणि मंगल मूल्यांवर माडगूळकरांचा नितांत विेशास आहे.
या संग्रहातील पुष्कळशा लेखांना त्यांच्या अस्सल भारतीय तत्त्वचिंतनाचा परिसस्पर्श झालेला आहे.
सामान्यांची दु:खे माडगूळकरांच्या सहृदय लेखणीतसामावली की, व्यक्त होताना त्या दु:खांना एक तीव्र धार चढते. काळजाला ती जाणवल्यावाचून राहत नाही.
त्या माणसांमधली उदात्तता सांगताना माडगूळकरांची शब्दकळा साक्षात चैतन्यरूप धारण करते.
– आनंद अंतरकर
Reviews
There are no reviews yet.